मालेगाव : शहरातील २७ अश्वशक्तीपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या यंत्रमाग व्यावसायिकांना वीज अनुदानासाठी ऑनलाइन नाेंदणीची अट लागू करण्यात आली आहे. नाेंदणी प्रक्रियेच्या अटींची पूर्तता करणे शक्य नसल्याने ऑनलाइन नाेंदणीची अट रद्द करून अनुदानाचा लाभ द्यावा, अशी मागणी वस्त्राेद्याेगमंत्री अस्लम शेख यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे. शहरात शंभर वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय सुरू आहे. एखाद्या पत्र्याच्या शेडमध्ये ४ ते २४ च्या संख्येत यंत्रमाग मशीनचा वापर करून व्यवसाय केला जात आहे. वर्षभरापूर्वी वस्त्राेद्याेग विभागाने २७ अश्वशक्तीपेक्षा कमी अथवा त्यापेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या यंत्रमागधारकांना वीज अनुदानासाठी ऑनलाइन नाेंदणी बंधनकारक केली आहे. अटी-शिथिल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन अस्लम शेख यांनी दिले. शिष्टमंडळात नगरसेवक अस्लम अन्सारी, ॲड. हिदायततुल्ला आदींसह यंत्रमाग कारखानदार उपस्थित हाेते.
वीज अनुदानासाठी ऑनलाइन नाेंदणी रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:10 AM