नाशिक : दीपोत्सवात सर्वाधिक महत्त्व पणत्या आणि विविध आकारांतील आकर्षक दिव्यांना असल्याने यंदाही बाजारात विविध प्रकारचे दिवे, पणत्या पहायला मिळत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या दिव्यांना मागणी वाढली असून, यात वेगळे आकार, लहान-मोठ्या पणत्या, प्राण्यांची चित्र, धनलक्ष्मी यांसारखे पर्याय आहेत. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने त्याला दीपोत्सव असे म्हटले जाते. यात आकाशकंदिलानंतर येतात त्या पणत्या आणि दिवे. या दिवाळीत नाशिकच्या बाजारामध्ये मातीच्या साध्या पणत्यांबरोबरच पणत्यांची थाळ, दिव्यांची माळ, मातीची समई, हत्तीवर दिवा घेऊन बसलेली लक्ष्मी, मातीचे झुंबर यांसारखे प्रकार पहायला मिळतात. यांच्या किमती साधारण १५ रुपये डझनपासून सुरू होऊन हजार रुपयांपर्यंत आहेत. ज्या ठिकाणी मातीच्या पणत्या मिळतात, त्याच ठिकाणी हे दिवेदेखील उपलब्ध आहेत. अनेक घरांमध्ये रांगोळीबरोबर ठेवण्यासाठी दिवे वापरले जातात. म्हणून या दिव्यांवर विशेष सजावट केलेली पहायला मिळते. कुंदन, मोती यांचा वापर करून पणत्या आणि मोठ्या दिव्यांवर सजावट केलेली आहे. सजावटीप्रमाणेच किमतीदेखील वाढलेल्या दिसतात.याशिवाय तेल बचत करणारे, तसेच तेलाच्या डागांपासून वाचू पाहणाऱ्यांसाठी फ्लोटिंग कँडलचा पर्याय आहे. दिव्यांसाठी नाशिकची मुख्य बाजारपेठ म्हणजेच रविवार कारंजा, मेनरोड याशिवाय गंगापूरनाक्यावरील सिग्नलवरदेखील दुकाने पहायला मिळतात. दिवाळीनिमित्त बाजारात आलेल्या आकर्षक दिव्यांची खरेदी करताना महिला. यावर्षी सजविलेल्या पणत्यांना मागणी. यावर्षी पर्यावरणपूरक वस्तूंना मागणी वाढलेली दिसते आहे. मातीच्या पणत्या असल्या तरी त्यांना सुरेख सजावट केलेली असल्यास त्याला मागणी आहे. यावर कुंदन वर्क किंवा मोती वर्क असल्यास जास्त पसंती मिळत आहे.
मातीच्या दिव्यांना मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 1:31 AM