कळवण मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेचा लाभांश वाटप निधी संशयित बुडीत निधीमध्ये वर्ग न करता तो सभासद कल्याण निधीमध्ये वर्ग करून सदर रकमेचे वस्तू स्वरूपात सभासदांना वाटप करण्यात यावे, अशी मागणी कमकोचे माजी चेअरमन रवींद्र नथु शिरोडे यांनी केली असून, भारतीय रिझर्व्ह बॅंकेने लाभांश वाटपास परवानगी का दिली नाही, याचा खुलासा करण्याचे आवाहन कमको बँकेला केले आहे.
कमकोची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या आठवड्यात होणार असून, सभासदांना देण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकान्वये लाभांश वाटपास परवानगी दिलेली नसल्याने सदर रक्कम संशयित बुडीत निधीमध्ये जमा करण्यास कार्योत्तर मान्यता देण्याचा विषय घेण्यात आला आहे. यासंदर्भात कमकोचे माजी अध्यक्ष रवींद्र शिरोडे यांनी सहाय्यक निबंधक, कळवण, जिल्हा उपनिबंधक, नाशिक तसेच कमको बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांना निवेदन पाठवले आहे. त्यात शिरोडे यांनी म्हटले आहे की, लाभांश वाटप परवानगीबाबत सदर रक्कम संशयित बुडीत निधीमध्ये वर्ग करण्याचे प्रस्तावित आहे. सदर लाभांश वाटप निधी बुडीत खात्यात वर्ग न करता तो सभासद कल्याण निधीमध्ये वर्ग करण्यात यावा. निवेदनावर शिरोडे यांच्यासह शेकडो सभासदांच्या स्वाक्षऱ्या आहेत.