लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : मागील वर्षासारखी जीवघेणी परिस्थिती ओढविण्यापूर्वी प्रभाग क्रमांक ९ मधील नैसर्गिक नाल्यांची व भूमिगत गटारांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याबरोबरच जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग उचलण्याची मागणी होत आहे.
गतवर्षी श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी श्रमिकनगर, माळी कॉलनीतील नैसर्गिक नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात यावी. तसेच राधाकृष्ण नगर, शिवाजी नगर, सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंड येथे रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा कचरा उचलला नाही, तर दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. या साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्तीही वाढत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगांची लागण होऊ शकते. आरोग्य विभागाने तातडीने साफसफाई मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
(फोटो २२ नाला) श्रमिकनगर येथील नैसर्गिक नाल्याजवळ कुजलेल्या अवस्थेत कचरा साचला आहे.