नाशिक : ड्रेनेजमध्ये पडून सफाई कामगाराच्या झालेल्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर गुन्हे दाखल होण्यासाठी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. विविध मागण्यांसंबंधीचे निवेदन समितीने आयुक्तांना दिले आहे. समितीचे पदाधिकारी सुरेश मारू, रमेश मकवाणा व ताराचंद पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातपूर औद्योगिक वसाहतीत साईश इंजिनिअरिंग कंपनीतील ड्रेनेजमध्ये पडून विनोद मारू या मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीमध्ये सफाई कामगारांचे दोन प्रतिनिधी घेण्यात यावेत, मयताच्या वारसांना नोकरी व दहा लाख रुपये भरपाई मिळावी, विनोद मारू यांच्या पत्नीस दिलेली फिक्स पे वरील आॅर्डर रद्द करून कायम वेतन श्रेणीचे आदेश देण्यात यावेत, साईश इंजिनिअरिंग या कंपनीच्या मालकाचीही चौकशी व्हावी, नाशिकरोड येथील मयत सफाई कामगार सतीश शिंदे यांच्याही वारसांना मनपा सेवेत त्वरित सामावून घ्यावे, सफाई कामगारांवर येणारा कामाचा जादा ताण कमी करण्यासाठी सफाई कामगारांची संख्या वाढवावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
सफाई कामगारांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी
By admin | Published: September 19, 2015 10:35 PM