दिंडोरी : पेठ तालुक्यातील शेतीचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील तळ्याचापाडा, वारे, वनारे, टिटवे, ननाशी, अंबोडा, मोखनळ, गांडोळे, गोळशी, जालखेड, चाचडगाव, उमराळे, कोचरगाव आदी भागांचा पाहणी दौरा केला. त्याप्रसंगी चारोस्कर बोलत होते. यावेळी चारोस्करांकडे शेतकर्यांनी कैफीयत मांडली. शेतकर्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी आलेल्या पावासामुळे होत्याचे नव्हते झाले. भात, नागली, वरई आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. या भागातील नुकसानीमुळे गुरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे. माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी तहसीलदार पंकज पवार यांच्याशी संपर्क साधला व पंचनामे करण्याची मागणी केली.शासनाने कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते विठ्ठल अपसुंदे, राकेश शिंदे, आनंदा पवार, दत्ता शिंगाडे, छगन पवार आदी उपस्थित होते.