मनमाड : राज्यात सर्वत्र चर्चेत असलेली स्मार्ट सिटीची संकल्पना मनमाड शहरातही राबवावी अशी मागणी होत आहे.रेल्वे जंक्शन, अन्न महामंडळ डेपो व इंधन कंपन्यांमुळे राज्याच्या नकाशावर सतत चर्चेत असलेले मनमाड शहर समस्याग्रस्त शहर न राहता सुंदर शहर निर्माण व्हावे यासाठी होऊ घातलेल्या नवीन विकास आराखड्यात महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या मनमाड शहर शाखेच्या वतीने सुचविलेल्या विविध मुद्द्यांवर पालिका कार्यालयात सुनावणी झाली. या समितीमध्ये सुभाष भामरे, गोरख कटारे, संदीप पोकळे, दिलीप मेहता यांच्यासह नगराध्यक्ष मैमुना तांबोळी, रवींद्र घोडेस्वार, नूतन पगारे यांचा समावेश आहे. या समितीने इंजिनिअर असोसिएशनसह सर्व संबंधितांच्या सूचना जाणून घेतल्या.वाहनतळांचा प्रश्न गंभीर असून, रेल्वेस्थानकासाठी दक्षिण भागात वाहनतळ तयार करणे याबरोबरच लॅँडस्केपिंग अंतर्गत नदीकाठचे सुशोभिकरण, मुलांसाठी मनोरंजन केंद्र आदि बाबींचे नियोजन आराखड्यात करण्याबाबत सूचना प्रस्तावित विकास आराखड्यासाठी सुचविण्यात आल्या आहेत. समितीने या सर्व सूचनांवर चर्चा करून अभ्यास केला. शहर विकासाच्या दृष्टीने सकारात्मक निणर्य घेण्यात येईल; मात्र यात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी इंजिनिअर असोसिएशनने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी आर्कि. अनिल चोरडिया असोसिएशनचे तालुका अध्यक्ष मुराद शेख, शहर अध्यक्ष स्वप्नील सूर्यवंशी, पराग पाटोदकर, अभिजित गुजराथी, हेमंत लाळे, मनोज बाफना, जितेश अरोरा, विक्रम चव्हाण, हार्दिक बेदमुथा, सम्यक लोढा यांच्यासह सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)
स्मार्ट सिटीची संकल्पना राबविण्याची मागणी
By admin | Published: December 16, 2015 11:02 PM