दिंडोरी : नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूची टेस्टिंग लॅब सुरू करावी, अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.झिरवाळ यांनी पत्रात म्हटले आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त रु ग्ण आढळून आले आहेत. तसेच रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नाशिक जिल्ह्यातही रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे ६५ लाख असून सध्या नाशिक येथे कोरोना विषाणूच्या टेस्टिंगसाठी लॅब उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या टेस्टिंगसाठी नमुने पुणे व भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे येते जातात. सदर टेस्टिंग नाशिक येथे होत नसल्याने रु ग्णांचा वेळेत चाचणीचा अहवाल येत नाही. त्यास बराच विलंब होतो. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासदेखील विलंब होतो.नाशिक जिल्ह्यात एक नवीन कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करावी तसेच त्यासाठी लागणारे मनुष्यबळ व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी नरहरी झिरवाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत संबंधितांना तशा सूचनादेखील केल्या असल्याचे झिरवाळ यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅबची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 11:45 PM