विंचूर : येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी नाव नोंदणी करून लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी सरपंच सचिन दरेकर यांनी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.शासनाने नुकतेच साठ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना तसेच पंचेचाळीस वयोगटांपासून पुढील परंतु काही आजार असलेल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची परवानगी दिली आहे. कोविड प्रतिबंधक लस देण्यासाठी तसेच नाव नोंदणीसाठी निफाड तालुक्यात सहा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.परंतु निफाड तालुक्याच्या पूर्वेला विंचूर हे सतरा ते अठरा हजार लोकसंख्या असलेले गाव असून या परिसरात आजूबाजूने बरीच छोटी-मोठी खेडी जोडलेली आहेत.
तेथील नागरिकांची नेहमीच कामानिमित्ताने विंचूर येथे वर्दळ होत असते. तसेच विंचूर येथे लासलगाव बाजार समितीची उपबाजार समिती असल्याने येथे गर्दी होत असते. येथील नागरिकांना सद्या नियोजित केंद्रावर लस घेण्यासाठी जाताना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागणार आहेत. या अडचणींचा विचार करून विंचूर येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड प्रतिबंधक लस देण्याचे केंद्र सुरू करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.