खडकी : शेतकरी व नागरी सुविधांसाठी जिल्हास्तरीय कार्यालयांची आवश्यकता भासत असल्याने मालेगाव जिल्हा लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. मात्र, मालेगाव जिल्ह्याची उपेक्षा होत असल्याने नागरिक चळवळ उभारून मोठा संघर्ष करणार आहेत. मालेगाव जिल्हा झाल्यास चाळीस वर्षाची प्रतीक्षा फळाला येणार असल्याने तालुक्याचे जिल्ह्यात रूपांतर होणार आहे. तसं पाहता मालेगाव तालुक्याने अनेक जनसेवक लोकप्रतिनिधी मंत्री पदापर्यंत पोहोचवले आहेत. मात्र अद्यापही मालेगाव जिल्हा प्रतीक्षेत आहे. मालेगाव जिल्ह्यासाठी अगोदर मोठ्या प्रमाणात प्रयत्नही झाले मात्र इतर तालुक्यांची जिल्ह्यांची निर्मिती झाल्यानंतरही मालेगावचा नंबर अद्यापही प्रतीक्षा यादीतच आहे. यासाठी मोठमोठ्या नेत्यांनी घोषणांचा पाऊस पाडला होता मात्र, या घोषणा अद्याप फलित झालेल्या नसल्याने नागरिकांनी मालेगाव जिल्ह्यासाठी पुन्हा आंदोलन किंवा उपोषण करण्याची तयारी दर्शविली आहे. तालुक्यातून नागरिक मोठ्या अपेक्षेने लोकप्रतिनिधींकडे जिल्हा निर्मितीसाठी डोळे लावून बसले आहेत. मात्र ही स्थिती अद्यापही बदलायच्या मार्गात नसल्याने यासाठी पुन्हा चळवळ सुरु होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मालेगाव जिल्हा करण्यासाठी अजून किती दिवस प्रयत्न करावे लागणार आहे याचा थांगपत्ता लागलेला नाही. नुसती वचनं दिली जात असताना मालेगाव जिल्ह्याकडे नागरिकांच्या सुविधा म्हणून पाहिले तरच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल अन्यथा मालेगाव जिल्हा हे पहाटे पडलेले स्वप्न खरे ठरत नाही असा विश्वास नागरिकांना पटणार आहे.
मालेगाव जिल्ह्यासाठी पूर्वी अनेक लोकांनी आपले योगदान दिले असले तरी महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्याच्या यादीत अद्याप कुठल्याही पद्धतीने दखल घेतली गेली नसल्याने मालेगावला सापत्न वागणूक दिली जाते काय असेच म्हणावे लागणार आहे. मालेगाव जिल्ह्यासाठी सद्यस्थितीत ७० ते ८० टक्के कार्यालय जिल्हास्तरीय असले तरी त्यांची कार्यवाही परिपूर्ण करण्यासाठी नाशिक वारी करावी लागते .यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.
-------------------------
रोजगाराविना बेराेजगार
महाराष्ट्र औद्योगिक वसाहत
महाराष्ट्र औद्योगिक वसाहत पूर्वीची मंजूर असतानाही सद्यस्थितीची जागा बदलूनही गुंतवणूकदार अद्याप जमीन खरेदी करून उद्योग सुरू करण्यास धजावत नाही. यामुळे मालेगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना कुठल्याही प्रकारच्या हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. याची दखल घेऊन लवकरात लवकर मालेगाव जिल्हा करण्याची मागणी मालेगाव तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.