मार्च २०२० पासून सर्व नागरिक कोरोनाचा सामना करत आहेत. या कालावधीत सर्व जण आपापल्या परीने योगदान देत आहेत. शिक्षक कर्मचारीही स्थानिक प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. रेल्वे, बसस्थानक, चेक पोस्ट, विलगीकरण कक्षावरील नेमणूक, वॉर रूम, निवडणुकांची कामे याबरोबरच रेशन दुकानदार म्हणूनही शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्यासोबतच शिक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना मात्र अद्यापही कोणतीही मदत मिळाली नाही. यापैकी बहुतांश शिक्षक कर्मचारी आपले मूळ गाव सोडून इतर जिल्ह्यांत कामाला आहेत. राज्यभर अशा शिक्षक कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शासनाने आता शिक्षकांना सुट्टी जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
इन्फो
शिक्षकांवर वाढता ताण
कोरोनामुळे गेले वर्षभर शिक्षक व कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ गावी जाता आले नाही. आईवडील, नातेवाईक, कुटुंबीय यांच्या सुखदुःखात सहभागी होता आले नाही. पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द झाल्या आहेत. निकालाची कामे सुरू आहेत. शिक्षकांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे ऑनलाइन वर्ग बंद करून सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची गरज आहे. शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.