मालेगाव : राज्यात कोरोनामुळे काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन अध्यापन करावे लागत असून, राज्य शासनाने सर्व शाळांना ऑनलाईन अध्यापन बंद करून वार्षिक निकाल पत्रक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ३० एप्रिलपूर्वी निकाल घोषित करून २ मेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्च २०२०पासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात मध्यंतरीच्या काळात मुंबई जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यात आली होती; परंतु कोरोना संक्रमणाची दुसरी लाट पाहता, पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. एप्रिल २०२०पासून ऑनलाईन अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित नसले, तरी ऑनलाईन माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया निरंतर सुरु होती. मागील वर्षभरापासून शिक्षक ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत. आता पहिली ते नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम आणि उजळणी पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पहिली ते नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल पत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन अध्ययन - अध्यापन तासिका बंद करुन विद्यार्थ्यांचा निकाल ३० एप्रिल २०२१पूर्वी घोषित करण्याबाबत निर्देश द्यावेत व २ मे २०२१पासून सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.