मनमाड : सध्या सुरू असलेल्या नांदगाव-मनमाड-चांदवड महामार्गावर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर विविध शासकीय संस्था, महाविद्यालय, शाळा असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मनमाड-चांदवड महामार्गावर मालेगाव नाका, निमोण चौफुलीवर भरधाव वेगात धावणाºया वाहनांमुळे सातत्याने छोटे-मोठे अपघात होत असतात. या रस्त्यावर जवळच मनमाड महाविद्यालय असून, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मनोरम सदन तसेच गुड शेफर्ड शाळेकडे जाणाºया विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. निमोण, डोणगाव, दरेगाव, गिरणारे आदी गावांकडून येणारी वाहने तसेच महामार्गावरील भरधाव वेगात येणारी वाहने अपघातास निमंत्रण देत असतात. या महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. या महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहून निमोण चौफुली, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वार, बुरकूलवाडी आदी भागात गतिरोधक बसविण्यात आले होते. सध्या या रस्त्याचे नव्याने काम करण्यात आले असून, त्यामुळे गतिरोधक काढण्यात आले आहेत. अपघात टाळण्यासाठी पुन्हा गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
मनमाड-चांदवड महामार्गावर गतिरोधकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 1:59 AM