नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने राज्य शिखर बॅँक व शासनाकडे सुमारे साडेचारशे कोटींचे पीक कर्ज मागितले असून, त्याबाबत अद्यापही शासन स्तरावरून निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास या हंगामासाठी १५ कोटींचे कर्ज देण्यासाठी बुधवारी (दि.२६) मुंबईत वसाका, जिल्हा बॅँक व राज्य शिखर बॅँकेची तातडीची बैठक झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेकडून पीक कर्ज देण्यासाठी शासनाने राज्य शिखर बॅँकेकडे तत्काळ थकहमी दिल्यास जिल्हा बॅँकेला ४५० कोटींचे कर्ज मिळू शकते. मागील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वामी नारायण मंदिरात जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी भेट घेऊन जिल्हा बॅँकेकडे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी निधी नसून, शासनाने जिल्हा बॅँकेने केलेल्या साडेचारशे कोटींच्या कर्जाचे तत्काळ वितरण करावे याबाबत निवेदन दिले होते. जिल्हा बॅँकेला तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बॅँकेच्या सर्वपक्षीय संचालक मंडळाने मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांची मुंबईत भेट घेण्याचे ठरले होते. बुधवारी (दि. २६) जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे व संचालक परवेज कोकणी मुंबईत होते; मात्र पीक कर्जासाठी त्यांनी नेमकी कोणाची भेट घेतली समजू शकले नाही. अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी मंत्रालयात आपले काम असल्याने गेल्याचे सांगितले. तिकडे राज्य शिखर बॅँकेत जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट, लेखा व्यवस्थापक बाळासाहेब कांकरिया चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी राज्य शिखर बॅँकेचे अध्यक्ष सुकदेवे यांची भेट घेऊन त्यांना वसाकाच्या चालू हंगामासाठी १५ कोटींचे कर्ज हवे आहे. मागील वर्षी जिल्हा बॅँकेकडून १३ कोटींचे कर्ज घेऊन त्याची परतफेड केली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
मागणी जिल्हा बॅँकेची, चर्चा वसाकाची
By admin | Published: October 27, 2016 12:18 AM