नाशिक : नाशिक शहरात दाखल रुग्ण आणि त्यांना लागणारे इंजेक्शन्स याचा विचार करता नाशिकमध्ये किमान आठ ते दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असताना गेल्या दोन दिवसांपासून चारशे ते पाचशे इंजेक्शन्स मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नाशिक जिल्ह्याला कोटा वाढवून देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सीमा हिरे यांनीही देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
नाशिक जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे ४७ हजारांहून अधिक आहे. त्यात अनेकांना डॉक्टर रेमडेसिविर इंजेक्शन्स देत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्याची गेल्या महिनाभरापासून टंचाई होत आहे. सध्या आठ ते दहा हजार इंजेक्शन्सची रोज मागणी असताना रविवारी सुमारे पाचशे तर सोमवारी सुमारे साडे चारशे इंजेक्शन्स येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांनी मागणी नोंदवूनही पुरवठा होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.