नाशिक : आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ब्राह्मण समाजातील घटकाच्या विकासाकरिता परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासह केंद्र व राज्य शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन करावे. परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त कायमस्वरूपी वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी सार्वत्रिक सुटी जाहीर केली जावी, ब्राह्मण समाजाला नोकरी, उद्योग, व्यवसाय, शिक्षण यात आरक्षण, सोयी सुविधा, संधी, अनुदान मिळाव्यात आणि आर्थिक दुर्बलांना विशेष आर्थिक मदत, अनुदान मिळावे अशा मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेलद्वारे पाठवून मागणी करण्यात आली आहे. ज्यांच्या शस्त्रात आणि शब्दात दोन्हीमध्ये अद्वितीय शक्ती आहे, असे श्री भगवान परशुराम ब्राह्मण समाजाचे परमदैवत आहेत. सर्व समाजांना सोबत घेऊन जन्मोत्सव अधिक मोठ्या साजरा झाला पाहिजे, यासाठी कायमस्वरूपी पुढील वर्षापासून त्यांच्या जन्मोत्सवदिनी सार्वत्रिक सुटी शासनाने त्वरित जाहीर करावी, अशी मागणी ॲड. भानुदास शौचे यांनी केली आहे. ब्राह्मण समाजापुढील अडचणी सोडवण्याचे तसेच, समाजविकासाचे सकारात्मक कार्य प्रभावीपणे होण्यासाठी महामंडळ लवकरात लवकर शासन स्तरावरून स्थापन झाले पाहिजे. ब्राह्मण समाज हा एकूण समाजाचा घटक असून समाजाला विकासाच्या विविध योजना, सवलती मिळणे अत्यावश्यक झाले आहे. त्यानिमित्ताने ब्राह्मण समाजाकरिता केंद्रशासन, राज्यशासन विशेषत्वे महाराष्ट्र शासन यांच्याकडे मागण्या करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.