नांदगाव : नांदगाव रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन काहीच करत नसल्याने सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन लढा उभारावा, असे मत येथे आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यासाठी नांदगाव रेल्वे कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे. महानगरी एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले. मध्य रेल्वे भुसावळ परिमंडलाच्या मेगा ब्लॉकमुळे कामायनी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असून, त्यामुळे हाल होणाऱ्या प्रवाशांना पवन दरभंगा एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस अप-सांकेत एक्स्प्रेसला तूर्तास थांबा देण्यात यावा, असे निवेदन नांदगाव स्टेशन प्रबंधक अग्रवाल यांना देण्यात आले. बैठकीस रंगनाथ चव्हाण, संतोष गुप्ता, दत्तराज छाजेड, नितीन जाधव, अॅड. सचिन साळवे, सुमित सोनवणे, सचिन देवकाते, संजय मोकळ, संदीप पाटील, अभिजित पवार, राहुल बागुल, प्रसाद वडनेरे, रूषी जाधव, मनीष बागोरे आदी उपस्थित होते.
नांदगाव रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेसना थांबा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:36 AM