अंदरसूल : येथे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनावरांसाठी सुरू केलेल्या चारा छावणीला किमान महिनाभर मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत आहे. येथे शेकडो जनावरे दाखल असून, या छावणीची मुदत ३० जून रोजी संपत आहे. मात्र अंदरसूल व परिसरात अजूनही समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जनावरांना चारा व पाणी उपलब्ध नाही. पावसाअभावी चारा व पाणीटंचाईचे संकट ‘जैसे थे’ असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना चारा छावणीचा लाभ घेता यावा यासाठी छावणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांसह शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक झुंजारराव देशमुख, उपतालुका प्रमुख अमोल सोनवणे, नारायण देशमुख यांनी केली आहे. तसे लेखी निवेदन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी येवला यांना देण्यात आले आहे.