बॅँकेच्या मनमानीचा आरोप : पालकमंत्र्यांनाही निवेदन; नापिकीमुळे आर्थिक अडचण
लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या वाकद येथील अशोक पिराजी वाळुंज व मंगल अशोक वाळुंज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुलाबाळांसह इच्छामरणाचा अर्ज केला आहे.येवला तालुक्यातील मुखेड येथील महाराष्ट्र बँक शाखेच्या मनमानीचा त्यांनी आरोप केला आहे. मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना समक्ष दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी असून, त्यासाठी आम्ही आॅनलाइन अर्जही केला आहे.संबंधित कर्जमाफीचा आपणास लाभ देण्यात आल्याचा संदेशही १ एप्रिल २०१८ रोजी प्राप्त झाला. मात्र मुखेड येथील महाराष्ट्र बँकेत चौकशीसाठी गेलो असता तेथील बँक व्यवस्थापकाने तुमच्या कर्जमाफीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नसल्याचे सांगत तुम्हाला कर्ज भरावेच लागेल असे सुनावले. मी वारंवार बँक शाखेला भेट दिली मात्र प्रत्येक वेळेस मला बँकेकडून नकारघंटाच मिळाली. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, माझ्या पत्नीच्या हृदयाची शस्रक्रि या व अर्धांगवायूचा आजार झाला असून, वेळोवेळी लागणारा औषधोपचाराचा खर्च, मुलीचे लग्न करणे आवश्यक आहे. मुलांचा शिक्षणाचा खर्च, दुष्काळ व अतिवृष्टी यामुळे नापिकीमुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. त्यामुळे आम्ही कर्ज भरू शकत नाही. महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना सन २०१६ पासून जाहीर केलेली आहे व आमचे कर्ज सन २०१० मधील असल्याने याही कर्जमाफी योजनेत आम्ही बसत नाही. त्यामुळे आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आमच्या पश्चात मुलांची परवड होऊ नये म्हणून आम्हाला मुलाबाळांसह इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या संदर्भात बँक व्यवस्थापक शशांक श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता, बँकेमार्फत कर्ज मंजूर झाल्याचे संदेश बँकेने ज्यांचे खात्याशी भ्रमणध्वनी नंबर जोडलेले आहेत त्यांना गेले आहेत. शिरवाडे व कानळद ही गावे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वरिष्ठांनी काळ्या यादीत टाकली असून, याबाबत तुमची तक्र ार लेखी दिल्यास मी वरिष्ठांना कळवतो. अशोक वाळुंज यांच्या प्रकरणात सरकारी पोर्टलचा दोष असून, त्यात बँकेचा कुठलाही दोष नाही, असे त्यांनी सांगितले.