मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु पावसाच्या लपंडावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. दीड महिन्यापासून अधून-मधून पडणाºया उन्हाच्या तीव्रतेमुळे मका, सोयाबीन, टोमटो, भुईमूग या पिकांना पावसाची गरज भासत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे मका , सायोबीनसारख्या पिकांचे शेंडे करपण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेले पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून पिकांना पाणी मिळणार का? जर पालखेड आवर्तनातून पाणी मिळाले तर मानोरी बुद्रुक, देशमाने, नेऊरगाव आदी परिसरातील खरीप पिकांना जीवदान मिळेल. काही भागात मृग नक्षत्रात पडलेल्या पहिल्याच दमदार पावसानंतर जमिनीतील ओलावा, गारवा कमी पडू लागला असून, दोन महिने उलटूनही पिके आजही थोड्या प्रमाणात तग धरून आहेत. उन्हाळ्यात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई अजूनही ग्रामीण भागात सुरूच असल्याने वाड्या-वस्त्यावरील नागरिक आजही पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील हातपंपाला पाणी कमी पडले आहे. पालखेडच्या आवर्तनातून देशमाने, मानोरी, मुखेड, सत्यगाव या चारही गावांतील बंधारे भरून मिळावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. हे आवर्तन मिळाल्यास किमान पिकांसाठी केलेली मेहनत, कष्ट वाया जाणार नाही अशा शब्दात शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.वितरिका नंबर २१ ही सर्वात लहान वितरिका असून, पाणी वितरिकेच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी जात नसल्याने या वितरिकेच्या रु ंदीकरणाची व खोली वाढविण्याची गरज आहे. या वितरिकेत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे झाल्याने पाण्याचा प्रवाह जोरात होत नसल्याने आलेल्या आवर्तनाचा फायदा शेतकºयांना होत नाही. त्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागाने तत्काळ झुडपांचे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. - नंदाराम शेळके, चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटीदोन महिन्यांपासून पाऊस पडत नसल्याने पाण्याविना पिके करपू लागल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पीकविमा अर्जाची मुदत शासनाने वाढवावी. - बाळासाहेब वावधाने, शेतकरी
पालखेडच्या आवर्तनातून बंधारे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 9:15 PM