डिजिटल फलकांमुळे मोसमपुलाचे विद्रुपीकरण
मालेगाव : शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोसम पुलावर सध्या फलकबाजी केली जात आहे. ऊठसूट छोट्या- मोठ्या कार्यक्रमांचे डिजिटल फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. उच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या आदेशांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. महापालिकेने शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
श्रीक्षेत्र चंदनपुरीत भाविकांची गर्दी
मालेगाव : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पौष पौर्णिमेपासून यात्रोत्सवाला सुरुवात होत असते. मात्र, कोरोनामुळे यात्रेवर बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील भाविकांनी विनायात्रा खंडोबा महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
सुकामेव्याच्या मागणीत वाढ
मालेगाव : शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. परिणामी, बाजारपेठेत सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या घरोघरी मेथीचे लाडू बनविण्याचे काम सुरू आहे. यासाठी लागणारे खजूर, डिंक, काजू, बदाम, खोबरे आदीच्या मागणीत वाढ झाली आहे. सुकामेव्याच्या दरातही वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मालेगावी मंदीमुळे यंत्रमाग कारखाने बंद
मालेगाव : सुताचे वाढलेले दर व कापडाच्या घटत्या मागणीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी यंत्रमाग कारखाने आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ ते १५ फेब्रुवारीदरम्यान कारखाने बंद राहणार आहेत. मंदीचा सामना करणाऱ्या कारखानदारांनी गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा कारखाने बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. शहरातील हबीब लॉन्समध्ये विविध यंत्रमाग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीला युसूफ इलियास, साजीद अन्सारी, निहाल दाणेवाला, शब्बीर डेगवाला, अल्ताफ किराणावाला, खलील मोईन आदींसह यंत्रमाग कारखानदार उपस्थित होते.
चणकापूरचे पाणी टेहरेपर्यंत सोडा : मागणी
मालेगाव : चणकापूर धरणाचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन टेहरेपर्यंत सोडावे, अशी मागणी वांजूळ पाणी संघर्ष समितीचे सदस्य प्रा. के.एन. अहिरे यांनी केले आहे. चणकापूर धरणात २ हजार ३७० द.ल.घ.फू. पाणीसाठा शिल्लक आहे. मालेगाव शहरासाठी पिण्याचे पाणी सोडताना याच पाण्यात आरक्षित असलेले पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कांद्याच्या दरात चढ-उतार सुरूच
मालेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी केंद्रावर लाल कांद्याच्या भावात गेल्या आठवड्यात चढ-उतार दिसून आले. साेमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याने २०० रुपयांची उसळी घेतली होती. लाल कांद्याला सरासरी १ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत आहे.
तालुका कृषी कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर
मालेगाव : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या आवारातील इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. आता कॅम्प रोडवरील या नवीन इमारतीतून कामकाज केले जाणार असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली आहे.