मालेगाव : शहरातील सरकारी, खासगी रुग्णालये व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे फायर ऑडिट करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सोयगावचे माजी सरपंच बापू बच्छाव यांनी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना दिले. नाशिक येथे मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २४ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. अशी घटना मालेगाव शहरात घडू नये, म्हणून मनपाने शहरातील सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे. मालेगाव शहरात वाडिया हॉस्पिटल, सामान्य हॉस्पिटल मालेगाव, अली अकबर हॉस्पिटल, महिला व बालकल्याण हॉस्पिटल ही सरकारी रुग्णालये असून, मन्सुरा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आहे. ग्रामीण भागात दाभाडी, रावळगाव, झोडगे, वडनेर, निमगाव, करजगव्हान, कळवाडी, सोनज या गावांमध्ये सरकारी दवाखाने जुने झाले आहेत. या इमारतीत फायर ऑडिट झालेले नाही, याची चौकशी करावी.
-------------------
आरोग्यमंत्र्यांना साकडे
या रुग्णालयांमध्ये ही योजना आहे? की नाही? असेल तर ती योजना चालू आहे? का बंद आहे? याची सविस्तर माहिती आरोग्य विभागाने घ्यावी. त्यांचे फायर ऑडिट करावे, अशी मागणी बापू बच्छाव यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. मालेगाव शहरातील सर्व रुग्णालयांचीही मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी करुन फायर ऑडिटची चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.