नायगाव - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात सध्या तीव्र पाणी टंचाई बरोबर जनावरांच्या चा-याची टंचाई निर्माण झाली आहे. खो-यातील पशुधन वाचविण्यासाठी शासनाने गावांमध्ये चारा डेपो बरोबरच पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी गोदा युनियन कृषक संस्थेचे उपाध्यक्ष रमेश डोमाडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प होत आहे. यंदा तर पावसाने निच्यांक नोंदवल्याने शेतक-यांना खरिपाचेही पीक हाती आले नाही. तसेच जनावरांसाठी चाराही करता आला नाही. कधी नव्हे एवढया मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या परिसरातील सर्वच विहिरींनी तळ गाठली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून परिसरातील सर्वच गावांमध्ये महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ फिरण्याची वेळ आली आहे. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतीही पडुन राहिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. सध्या वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या बनली आहे. त्याच बरोबर जनावरांच्या चा-याचाही प्रश्न बिकट बनला आहे. पाण्याअभावी यंदा बाजरी, गव्हू, सोयाबीन, मका, भुईमूग, ज्वारी आदी पीक घेता न आल्याने यंदा शेतक-यांना चा-याच्या प्रश्नावरून हैराण झाले आहे. सध्या शेतकरी निफाड तालुक्यातून महागड्या भावाने उसाची खरेदी करून तो चारा म्हणून जनावराना घालत आहे. नायगाव परिसरात शेतकºयांबरोबर अनेकांकडे मोठया प्रमाणात गायी, म्हैस, बैल, शेळ्या-मेंढ्या आदी पशुधन आहे. मात्र गेल्या तीन महिन्यापासुन पशुपालक चारा व पाण्याअभावी जनावरांना बाजारची वाट दाखवत असल्याचे चित्र दिसत आहे. चारा-पाण्या अभावी पशुधनाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शासनाने चारा छावणी किंवा चारा डेपो तसेच पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी गोदा युनियन कृषक संस्थेचे उपाध्यक्ष रमेश डोमाडे यांच्यासह पशुपालक करत आहे.
नायगाव खोऱ्यात चारा डेपो सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 3:28 PM