सिन्नर : शहरातून जाणाऱ्या संगमनेर नाका ते मुसळगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणासह तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. कोकाटे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. सिन्नर-शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, मंजुरीप्रमाणे नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर बायपास गुरेवाडीपासून पूर्वी अस्तित्वात असलेल्या सिन्नर-शिर्डी महामार्गाला मुसळगाव एमआयडीसी येथे जोडला आहे. परंतु संगमनेर नाका ते मुसळगाव एमआयडीसीपर्यंत चार किमी अंतर हे नवीन मंजुरीमध्ये वगळण्यात आले असून, गुरेवाडी ते मुसळगाव एमआयडीसी या नवीन रस्त्याचा समावेश त्यात केला आहे. त्यामुळे सातत्याने वर्दळ असलेल्या संगमनेर नाका ते मुसळगाव औद्योगिक वसाहत हा चार किमी रस्ता चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. या चौपदरीकरणाच्या कामासाठी प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात संबंधित विभागास आदेश देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, मतदारसंघातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ११ रस्त्यांच्या कामांसाठी आमदार कोकाटे यांनी तब्बल १२० कोटींच्या निधीची मागणी गडकरी यांच्याकडे केली आहे. नागपूरला बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नाशिक येथील उद्योजक, व्यापारी, सामान्य नागरिकांना महत्त्वाच्या असलेल्या आणि ओझर ते शिर्डी या दोन विमानतळांना सिन्नर मतदारसंघातून वावी, देवकौठे, रांजणगाव मल्हारवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणाकामी सुमारे १०० कोटींचा निधी अपेक्षित आहे. या रस्त्याचे १० मीटर रुंदीकरण अथवा चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. यापैकी अडीच किलोमीटरकरता भूसंपादन आवश्यक असून, त्यासाठी दहा कोटींचा निधी लागणार आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग निधीतून या रस्त्यासाठी तरतूद करण्याची मागणी आमदार कोकाटे यांनी केली.
फोटो - २६ कोकाटे दिल्ली येथे विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना देऊन त्यांच्यासोबत चर्चा करताना आमदार माणिकराव कोकाटे.
260721\242426nsk_46_26072021_13.jpg
दिल्ली येथे विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देऊन त्यांच्यासोबत चर्चा करताना आमदार माणिकराव कोकाटे.