लोहोणेर : कांद्याला शासनाने हमीभाव द्यावा या मागणीसाठी नाशिक येथे आमरण उपोषणास बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने साखळी उपोषण आयोजित करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहावे, असे आवाहन कांदा उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष कुबेर जाधव यांनी दिली.कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने गेल्या तीन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्याला दोन हजार रु पये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, कांद्याला निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, जून-जुलै ते आॅक्टोबरनंतर आलेल्या कांद्याला किमान ५०० रु पये अनुदान घोषित करण्यात यावे आदि मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. उपोषणास बसलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुबेर जाधव, माणिक निकम, नानाजी पवार, रवींद्र शेवाळे, सुनील पवार, फुला जाधव, बाळू निकम, भास्कर निकम, शांताराम जाधव, भिका सोनवणे, संजय सावळे, शेखर बोरसे, प्रभाकर पाटील, राजेंद्र जाधव आदिंनी केले आहे. (वार्ताहर)
कांद्याला हमीभाव देण्याची मागणी
By admin | Published: September 30, 2016 11:58 PM