नाशिक : घरघरांत विराजमान झालेल्या लाडक्या गणपती बाप्पाकरिता लहान-मोठ्या आकारांत आणि सर्वसामान्यांना परवडतील, अशा कलाकुसरीची सोन्या-चांदीची आभूषणे, पूजेचे साहित्य सराफी बाजारात उपलब्ध असून, गणेशोत्सवात बाप्पाचे हार, दुर्वा, मोदक यांसारख्या चांदीच्या विविध वस्तूंचा सेट दोनशे रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत, तर सोन्याचे अलंकार व पूजेच्या वस्तूंचा सेटची किंमत दीड ते दोन लाख रु पयांहूनही अधिक आहे. परंतु, गणेशोत्सवाच्या पार्श्वभ्ूामीवर अनेक गणेशभक्त त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार मौल्यवान सोन्या-चांदीपासून तयार केलेल्या पूजेच्या साहित्याची खरेदी करीत आहेत. ग्राहकांच्या आवडी-निवडीवरून वस्तूंची खरेदी लाखो रु पयांत होत असली, तरीही मध्यमवर्गीय नागरिक मात्र चांदीचेच दागिने, वस्तू व पूजेच्या साहित्याला अधिक पसंती देत आहेत. घरच्या बाप्पांकरिता अनेकविध प्रकारचे चांदी-सोन्यातले अलंकार व पूजा साहित्य खरेदीसाठी सराफी पेढ्यांवर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. गणेशोत्सवातच महालक्ष्मींचे (गौरींचे) आगमन होत असते, त्यामुळे बाप्पा आणि गौरींकरिता सोन्या-चांदीच्या दागिन्यांची महिलांकडून विचारणा होत आहे. चांदी-सोन्यासह, ‘नॉन सिल्व्हर’ मध्येही अलंकारांचे विविध प्रकार उपलब्ध असून, त्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. श्रींच्या चांदीच्या पूजेच्या सेटमध्ये पानसुपारी, कमळ, जास्वंद, केवडा, मोदक, दुर्वा, शमीचे पान, जानवी जोड, हार, गणपती छोटीशी प्रतिमा, आरती संग्रहाचे पुस्तक, हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल, आहेत. ‘नॉन कॉपर’च्या आसन व उपरण्याला सोन्याचे पाणी दिल्याने त्याची झळाळी उजळून दिसत असल्याने अनेकजणांकडून मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या आसन, नारळ व अन्य साहित्यांची मागणी होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात घरच्या मूर्तीला साजेसे चांदीमध्येच जास्वंद, चाफ्याच्या फुलांचे उपलब्ध आहेत. गौरींचे कंबरपट्टे, कंठी, गणपतीसाठी सुंडाभूषण, त्रिशुल, परशु, हातातले तोडे, मुकुट, टोप, छत्री, पंचारती, दीपमाळ, समई, लामणदिवे, छोट्या दीपमाळ, ताह्मण, नैवेद्याचे ताट-वाटी, फुलपात्रे अशा अनेक वस्तूंना मागणी आहे. मोत्यांमध्येही गौरीकरिता चिंचपेटी (गळ्यातला दागिना), अमेरिकन डायमंडचा नेकलेस, मोत्याचे तोडे, बांगड्या, मोत्याचा तुरा, मोत्याची माळ आदि विविध अलंकारांना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.-राजेंद्र ओढेकर, माजी अध्यक्ष, सुवर्णकार संघटना, नाशिक
बाप्पांसाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:25 AM