येवला : तालुक्यातील सर्व नद्यांवरील बंधारे व तलाव चालू आवर्तनातून भरून द्यावे, अशी मागणी येथील सकल मराठा समाजाने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात जून महिन्याच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला होता. या पावसाच्या भरोशावर परिसरात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वच पिके धोक्यात आली आहेत. पिके वाचविण्यासाठी पालखेड कालवा लाभक्षेत्रातील सर्व बंधारे, नद्या, नाल्यांना पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण तालुक्यात विहिरींना आजपावेतो पाणी उतरलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतित आहे. हजारो रु पये खर्च करून शेतीसाठी खते, बियाणे वापरले आहेत. रब्बी पिकासाठी विहिरींना पाणी उतरणे गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली करूनही अद्यापपावेतो पूर्ण केली जात नाही. हा प्रश्न प्रलंबित असून, शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकºयांच्या संतापाचा कडेलोट होऊ नये असे ही निवेदनात म्हटले आहे. पालखेड प्रशासनाने आजवर या प्रश्नांची निव्वळ चेष्टाच केली आहे. धरणे ओव्हरफ्लो झाले असून, ओव्हरफ्लोचे पाणी नद्यांना सोडले जात आहे. त्यामुळे चालू आवर्तनातून बंधाºयांना पाणी द्यावे, त्यावर चर्चा नको तर पाणी सोडून उत्तर द्यावे. पालखेड कालवा प्रशासनाच्या संवेदना बोथट झाल्या असून, पाण्याचा शेतकºयांच्या हितासाठी वापर व्हावा. शासनाने चालू आवर्तनातून तालुक्यातील सर्व बंधारे, तलाव भरून द्यावे अन्यथा येवला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर सुदाम पडवळ, पांडुरंग शेळके, संतोष मढवई, प्रवीण निकम, हरिदास पवार, कैलास गायकवाड, सूर्यभान गायकवाड, चंद्रकांत ठोंबरे आदींच्या स्वाक्षºया आहेत. फोटो कॅप्शनयेवला तालुक्यातील सर्व नद्यांवरील बंधारे व तलाव चालू आवर्तनातून भरून द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना निवेदन देताना सुदाम पडवळ, पांडुरंग शेळके व कार्यकर्ते. (फोटो २१ येवला)
आवर्तनाने बंधारे भरून देण्याची सकल मराठा समाजाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 7:34 PM