सिन्नर : देशात लस निर्मितीचा वेग व वितरणाची पद्धती पाहता भारतात लसीकरणासाठी मोठा कालावधी लागू शकतो. मात्र नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवून कमी कालावधीत जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिकला जिल्हास्तरावर लस खरेदीचे ग्लोबल टेंडर राबविण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे वडांगळीचे माजी उपसरपंच नानासाहेब खुळे यांनी केली आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी लस हेच एकमेव प्रभावी माध्यम असल्याचे सर्वत्र बोलले जाते. मात्र सरकारकडून मिळणारी लस ही अत्यंत कमी मिळते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ५० लाख नागरिकांचे लसीकरण होण्यास खूप कालावधी लागेल. त्यामुळे खुळे यांनी मागणी केली आहे की, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पालकमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील किमान २५ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी लस खरेदीचे ग्लोबल टेंडर काढावे. त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका यांना मिळणारा १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करावा. शासनाकडून जी मोफत लस प्राप्त होत आहे, ती उर्वरित लोकांना देण्याचा पर्याय खुळे यांनी सुचवला आहे.
-----------------
आपला जिल्हा कोरोनामुक्त व्हावा. १४० कोटी लोकसंख्येचे लसीकरण लवकर होणे शक्य नाही. लसीकरण वेळेत पूर्ण झाले नाही तर कोरोनाचा उद्रेक वारंवार होईल. त्यामुळे देश, राज्य यापेक्षा जिल्हास्तरावर लसीकरणाचे नियोजन केले तर त्याचा फायदा होईल. लस उत्पादन कमी आहे. मात्र जगभरातील विविध कंपन्यांकडून टप्प्याटप्प्याने तीन महिन्यात २५ लाख लोकांसाठी ५० लाख लसींचे डोस उपलब्ध होण्यास अडचण येणार नाही.
- नानासाहेब खुळे
माजी उपसरपंच, वडांगळी ता. सिन्नर