नाशिक : जिल्हा परिषद गट व गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आवश्यक त्या जिल्हा परिषद गटांमध्ये सक्षम उमेदवार व त्या त्या आरक्षणांचे उमेदवार नसल्याने राजकीय पक्षांनी आता इतर पक्षांतील इच्छुकांना तालुका बदलून अन्य गटांमध्ये उभे राहण्याची आॅफर दिल्याची चर्चा आहे.जिल्हा परिषदेच्या बागलाण तालुक्यातील पठावे दिघर या गटावर तालुक्याबाहेरील इच्छुकांचा जास्त व्होरा आहे. येथून विद्यमान सदस्य सिंधूताई सोनवणे यांचे पती संजय सोनवणे राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून प्रबळ दावेदार मानले जात असतानाच येथूनच राष्ट्रवादीचे गटनेते रवींद्र देवरे यांनीही चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर दिंडोरी लोकसभा कॉँग्रेस अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सभापती शैलेश पवार यांनीही आपल्याला ग्रामस्थांचाच आग्रह असल्याचे सांगत कॉँग्रेसकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. देवळ्यातील लोहणेर गटातून निवडून आलेले भाजपाचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी पठावे दिघर गटातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चाचपणी सुरू केली आहे. तसे दौरेही केदा अहेर यांनी केले आहेत. इतके कमी की काय म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक सचिन सावंत यांच्याही नावाची याच गटातून चर्चा आहे. ताहाराबाद गट अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने येथून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांना स्थानिक ग्रामस्थांनी आवतन दिल्याची चर्चा आहे. नांदगावचे माजी आमदार मालेगाव तालुक्यातील निमगाव गटातून भाजपाकडून निवडणूक लढविणार असून, त्यासाठी त्यांनी नुकताच शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला आहे. एकूणच काय, आयात उमेदवारांसाठी राजकीय पक्षांकडून पायघड्या घातल्या जात असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
आयात उमेदवारांची मागणी वाढणार
By admin | Published: October 25, 2016 2:02 AM