फलक नसल्याने संभ्रम
नाशिक : शहरात कोरोना रुग्ण वाढत असले तरी महापालिकेने अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्राचे फलक लावले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कोणत्या परिसरात रुग्ण आहे किंवा नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
किरकोळ बाजारातही कांदा दर उतरले
नाशिक : घाऊक बाजाराबरोबरच किरकोळ बाजारातही कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. किरकोळ बाजारात कांदा १५ ते २० रुपये किलोने मिळू लागला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना मात्र उत्पादन खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
रेमेडीसीवीरसाठी नातेवाईकांची भटकंती
नाशिक : रेमेडीसीवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी अनेक कोरोना रुग्णांचे नातेवाईक मेडिकल दुकानांमध्ये चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे काही दुकानांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागल्याचे दिसून येते. शासनाने या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
प्रतिक्षा यादीशिवाय बेड मिळणे मुश्कील
नाशिक : कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने शहरातील लहान- मोठ्या सर्वच रुग्णालयांमध्ये बेड मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादी वाढली आहे. बेड मिळविण्यासाठी रुग्णांना अगोदर नोंदणी करावी लागत असून त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी बेड उपलब्ध होत असल्याची स्थिती आहे. तोपर्यंत रुग्णांना घरीच उपचार घ्यावे लागतात. यामुळे काहीवेळी रुग्णाची स्थिती गंभीर होण्याचा धोका निर्माण होतो.
समाजमाध्यमांवर प्रबोधनाचा भडीमार
नाशिक : कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून समाजमाध्यमांवर याविषयी प्रबोधनाचे अनेक संदेश फिरत असून परस्परांना आपापली काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. यासंंबंधीचे व्हिडिओ, ऑडीओ क्लीप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक नागरिक तर सकाळ, संध्याकाळ याबाबत मेसेज पाठवित असतात.
शेतीमालाची आवक वाढली
नाशिक : लॉकडाऊनच्या भीतीने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक वाढली असल्याचे दिसून येत आहे. वाढलेल्या आवकमुळे शेतीमालाच्या दरावर त्याचा परिणाम झाला आहे. कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
प्रशासनाने संभ्रम दूर करण्याची मागणी
नाशिक : जीवनावश्यक वगळता इतर सर्व वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असले तरी अनेक परिसरात विविध प्रकारची दुकाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. बंदबाबत व्यापाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
बाजारात काही वस्तूंचा कृत्रिम तुटवडा
नाशिक : संपूर्णपणे लॉकडाऊन नसला तरी काही वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून व्यापाऱ्यांनी त्या वस्तूंचे दर वाढविले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. अन्न व औषध प्रशासनाने अव्वाच्या सव्वा दराने वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शहरात सर्रासपणे अवैध मद्यविक्री
नाशिक : राज्य शासनाने मद्यविक्रीची दुकाने बंद केल्याने शहरातील विविध भागांत अवैध मद्यविक्रीला ऊत आला आहे. अनेक ठिकाणी सर्रासपणे अवैधरित्या मद्यविक्री सुरू असून पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्यविक्रीला पायबंद घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.