निऱ्हाळे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने बसफेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांसह पालकांनी केली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या पध्दतीने शिक्षण घेण्यात अडचणीला सामोरे जावे लागले.
ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कची अडचण, त्यातच आधी संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाकडे ॲण्ड्रॉईड मोबाइलचा अभाव आणि नियमित शेतीकामे यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसमध्ये जॉईन होणे अवघड होत होते. निऱ्हाळे -सिन्नर या मार्गावर सध्या दोन बसफेऱ्या सुरू आहेत. त्यात मुख्य निऱ्हाळे मुक्कामाची व सकाळी आठ, १२,२,४ अशा पूर्वीप्रमाणे बसेस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी परिसरातील प्रवाशी वर्गाने केली आहे.
सकाळी ६ :४५ च्या बसने निऱ्हाळे, फत्तेपूर,मऱ्हळ, सुरेगाव, कनकोरी, मानोरी, नांदलरशिंगोटे येथील विद्यार्थी दोडी व सिन्नर येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. या मार्गावरील निऱ्हाळे मुक्कामाची बस व इतर फेऱ्या लवकर सुरू कराव्या अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.