नाशिक : सातपूर येथील महापालिकेच्या मायको दवाखान्याचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एका गभर्वती महिलेला परिचारिकांकडून अपमानास्पद वागणूक देत डॉक्टरांनी येण्यास विलंब करून हलगर्जीपणा केल्यामुळे नवजात शिशू दगावल्याचा आरोप गर्भवती महिलेचा पती नितीन मोरे यांनी महापालिका, पोलीस आयुक्त यांच्याकडे दिलेल्या अर्जात केला आहे.स्वारबाबानगर येथील रहिवासी असलेल्या मोरे यांच्या गरोदर पत्नीला बाळंतपणाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी तत्काळ महापालिकेच्या मायको दवाखान्यात शुक्रवारी (दि.२४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दाखल केले. त्यावेळी वैद्यकिय अधिकारी दवाखान्यत उपलब्ध नव्हत्या. परिचारिकांनी त्यांच्या पत्नीसोबत अश्लील भाषेचा वापर करत अपमानास्पद वागणूक दिली. उपचार करण्याऐवजी स्टूलवर बसवून ठेवत डॉक्टर येण्याची प्रतीक्षा करायला सांगितल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. उशिरा वैद्यकिय अधिकारी पावसकर यांचे दवाखान्यात आगमन झाले. त्यांनी मोरे यांच्या पत्नीची तपासणी करून सकाळी आठ वाजता प्रसूतीची वेळ सांगितली. मात्र महिलेला खूप वेदना होत असल्याने सलाईनद्वारे इंजेक्शन त्यांनी दिले. तरीदेखील त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे महिला व नातेवाईक मेटाकूटीस आले. शनिवारी (दि.२५) दुपारी महिलेची आई दवाखान्यात आली असता त्यांनी बघितले तर बाळाचे डोके बाहेर आल्याचे दिसले. त्यानंतर बराच प्रयत्न करून वेळेत प्रसूतीसाठी डॉक्टर, परिचारिकांकडून प्रयत्न न झाल्यामुळे बाळ दगावल्याचे अर्जदार मोरे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. याप्रकरणी महापालिका आरोग्यविभागाने चौकशी करून दोषी डॉक्टर व परिचारिकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी अर्जाद्वारे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह सातपूर पोलीस ठाण्याचे निरिक्षकांकडे केली आहे.
चौकशीची मागणी : मनपा डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे बाळ दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:55 PM
स्वारबाबानगर येथील रहिवासी असलेल्या मोरे यांच्या गरोदर पत्नीला बाळंतपणाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी तत्काळ महापालिकेच्या मायको दवाखान्यात शुक्रवारी (दि.२४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दाखल केले.
ठळक मुद्देदोषी डॉक्टर व परिचारिकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीपरिचारिकांनी अश्लील भाषेचा वापर करत अपमानास्पद वागणूक दिली