नाशिकरोड : जेलरोड दसक पुलाजवळ नदी पात्रात पाच दिवसांपूर्वी मयत स्थितीत आढळुन आलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जेलरोड दसक येथील किराणा दुकानापासून गेल्या २९ मार्च रोजी १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा मृतदेह जेलरोड दसक पुलाजवळील गोदावरी नदी पात्रात आढळुन आला होता. याप्रकरणी उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना अखिल भारतीय कुमावत सभेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मयत मुलगी ही अत्यंत सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलगी आहे. दहावीला असलेली ती मुलगी जवळच राहाणाºया शिक्षिकेकडे अभ्यासात आलेली अडीअडचणी विचारण्यास जात होती. याचा त्या शिक्षिकेच्या भावाने गैरफायदा घेत त्या अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य केल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. त्या मुलीला धमकावत तिचे कुटुंब गरीब असल्याने काहीच करू शकत नाही असे लक्षात घेऊन त्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. मयत अल्पवयीन मुलीने शिक्षिकेचा भाऊ करत असलेल्या गैरकृत्याबाबत तिने आपल्या बहिणीला सांगितले होते. मयत अल्पवयीन मुलीच्या बहिणीने सदर माहिती पोलिसांना दिली असून शिक्षिकेचा भाऊ त्या घटनेपासून फरार आहे. त्या अल्पवयीन मुलीवर गैरकृत्य केल्याचा संशय असून तिच्या मृत्युची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर महाराष्ट्र कुमावत सभेचे सचिव देविदास परदेशी, विभाग अध्यक्ष भाऊसाहेब परदेशी, जिल्हाध्यक्ष शिवाजी कारवाळ, अशोक भवरे, भगवान अनावडे, अमोल पंडीत कुमावत, भाऊसाहेब माचीवाळ, कैलास सारडीवाळ, राजुभाऊ कुमावत, शामराव कुमावत आदींच्या सह्या आहेत.
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:41 AM