नाशिक : लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तिघा अधिकाºयांच्या चौकशीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने यासंदर्भात दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात केली आहे.या पत्रात मुंडे यांनी म्हटले आहे की, रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाखांची लाच घेणाºया तीन अधिकाºयांना आपल्या विभागामार्फत रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, लाचखोरीचे प्रकार चालतात. याबाबतच्या अनेक तक्रारी माझ्याकडेही प्राप्त झालेल्या आहेत. लाच स्वीकारताना अटक केलेल्यांमध्ये कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार यांचा समावेश आहे. पवार हे सत्ताधारी पक्षातील उच्च पदस्थांचे नातेवाईक आहेत. तसेच त्यांचे अनेक उच्च पदस्थ अधिकाºयांशी अतिशय घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे या प्रकरणात तपासणीच्या कामात या लोकप्रतिनिधी, अधिकाºयांकडून अडथळा, दबाव आणला जात असल्याची माझी माहिती आहे. अशा कोणत्याही दबावाला बळी न पडता लाचखोरीच्या या प्रकरणाची अतिशय सखोल चौकशी करावी, लाच घेताना अटक केलेल्या या तीनही अधिकाºयांच्या कार्यकाळातील संपूर्ण कामाची चौकशी करावी.या अधिकाºयांनी अवैधरीत्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केलेली असल्याने त्यांच्या संपूर्ण संपत्तीची चौकशी होणेही आवश्यक आहे. याबाबत सखोल चौकशी करून या लाचखोर अधिकाºयांवर कठोर कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत मला अवगत करावे, अशी सूचनाही मुंडे यांनी पत्रात केली आहे.
लाच प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांची चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:10 AM