येवला : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असल्यातरी शासनाकडून तसे होताना दिसत नाही. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.येवला बाजार समितीत गेल्या तीन महिन्यांत दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जाणारा कांदा आज सातशे रुपयांवर आला आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य अंबादास बनकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यंदा अवकाळी व परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची लागवड केली. मात्र परतीच्या पावसाने उशिरापर्यंत मुक्काम केल्याने खरीपसह रब्बी पिकांची वाट लागली. शेतात पाणी साचल्याने चिखल झाला. कांद्यासह मका पीक पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याचे उत्पादन २० ते २५ टक्क्यांपर्यंत घसरले. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने गेल्या दोन महिन्यात कांदा दर गगनाला भिडलेले दिसले. असे दिसत असले तरी उत्पादनात कमालीची घट झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या पदरात फारसा लाभ पडला नाही. नवीन कांदा निघालयला सुरु वात झाली आहे. त्यामुळे बाजारभाव दोन हजार रु पयांच्या खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात कांद्याची आवक वाढून दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त होत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी बनकर यांनी निवेदनात केली आहे.
कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 10:16 PM