दाभाडी : केंद्र सरकारच्या निर्यातबंदी निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. कांदा पिकावर वर्षभराची आर्थिक समीकरणे जुळविणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी, असे आवाहन दाभाडी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.कसमादे पट्टा डाळिंबाचे कोठार म्हणून ओळखले जात होते. परंतु तेल्या व मर रोगामुळे डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. परिणामी दाभाडी परिसरातील शेतकरी कांदा लागवडीकडे वळाला. कांद्याला एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो; परंतु मिळणारे बाजारभाव पाहता यातुन खर्चही भरून निघणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट पसरली आहे.कांदा उत्पादन हे तीन हंगामात घेतले जाते. पोळ कांदा, रांगडा कांदा व उन्हाळ कांद्याची टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. साधारणत: एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. ५० ते ६० क्विंटल उत्पादन पोळ कांद्यापासून मिळते. रांगडा कांद्याच्या तुलनेत उन्हाळी कांद्याचे उत्पादन अधिक होते. उन्हाळ कांदा साठवून ठेवणे शक्य आहे; परंतु पोळ कांदा जास्त दिवस साठवता येत नाही. तरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करत आहेत. (वार्ताहर)
कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी
By admin | Published: September 10, 2014 9:54 PM