----
घरांच्या सर्वेक्षणाचा नागरिकांनी घेतला धसका
मालेगाव : शहरात महापालिकेतर्फे घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याचा नागरिकांनी धसका घेतला आहे. शहरातील घरांच्या सर्वेक्षणास राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. आधीच कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या नागरिकांना घरांचा सर्व्हे करुन अधिकच्या कर आकारणीचा बोजा टाकू नये, अशी मागणी होत आहे.
-----
ॲसिड पिऊन विवाहितेची आत्महत्या
मालेगाव : शहरातील जाफरनगर भागात राहणाऱ्या रुबिना सोहराबअली (४०) या महिलेने शनिवारी सासरच्या छळाला कंटाळून ॲसिड पिऊन आत्महत्या केली. पती व सावत्र मुलांच्या जाचास कंटाळून तिने हे पाऊल उचलले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सोहराब मोहंमद शरीफ व सासरच्या लोकांविरुद्ध आयेशानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेचा भाऊ मोहंमद युसूफ मोहंमद हारुण यांनी फिर्याद दिली. गेल्या दोन वर्षांपासून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता.
----
कोरोना लसीबाबत जनजागृतीची गरज
मालेगाव : शहर परिसरात आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या कोरोना लसीकरणाचा आता ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. शहरात मोठ्या संख्येने यंत्रमाग कामगार असून, त्यांच्यात जनजागृतीची गरज आहे. लस कधी व कशी घ्यायची याबाबत पूर्व भागात आरोग्य विभागाने जनजागृती करून नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याची गरज आहे.
-----
मालेगावी अघोषित संचारबंदी
मालेगाव : शहरात उन्हाचा कडाका वाढू लागला असून, रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने ग्रामीण भागात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे शहरात दैनंदिन कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची संख्या घटली आहे. त्याचा परिणाम खासगी वाहन सेवेवर जाणवत आहे.