कोरोनाच्या महामारीत बाधित रुग्णाला वरदान ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वत्र काळाबाजार होत आहे. त्यातच गंभीर बाधित रुग्णांना ऑक्सिजनची मारामार आणि काही रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत. या सगळ्यावर कळस आणि संताप आणणारी घटना ओझर, ता.निफाड येथे घडली असून, एका कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही युवकांनी तब्बल दहा हजार रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला तर दुसऱ्या घटनेत हृदयविकाराने निधन झालेल्या एका वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यासाठी याच युवकांनी पाच हजार रुपये घेतल्याची बाब समोर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अंत्यविधीसारख्या ठिकाणी अनेक लोक जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्काराला देखील उपस्थिती नगण्यच असते. त्यातच कोरोनाने मृत्यू झाला असेल तर जवळचे आप्त -नातलग देखील पाठ फिरवत आहेत. त्याचाच गैरफायदा काही संधीसाधू युवक उठवत असल्याचे समोर आले आहे. ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोट....
ओझर नगरपरिषदेने कोणत्याही कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. हा प्रकार निर्लज्जपणाचा कळस असून या महामारीत सर्वांनी एकमेकांना मदत करावी. कोणाकडे पुन्हा अशी मागणी झाल्यास त्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
- शरद घोरपडे, प्रशासक, ओझर नगरपरिषद.
याप्रकरणी कडक कारवाई करावी. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारा आहे. ज्यांनी हा प्रकार केला. ते नगरपरिषदेचे कर्मचारी नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
-हेमंत जाधव
माजी सरपंच, ओझर