येवला : रोजगार हमीच्या कामाचे पैसे खात्यावर वर्ग करा, या विखारणीच्या मजुराची कैफियत घेऊन जाणाऱ्या याच गावातील दोन माजी सरपंचासह, राष्ट्रवादीच्या युवक तालुका अध्यक्षाकडेच येवल्याच्या पंचायत समितीमधील उपअभियंत्याने बील देयकावर स्वाक्षरीचे बारा हजार रुपये मागितल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.दरम्यान, येत्या तीन दिवसात मजुरांच्या कामाचे पैसे मिळाले नाही, तर मजुरांसह येवला पंचायतीसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पंचायत समितीला त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. विखरणी ग्रामपंचायतअंतर्गत, विखरणी कानडी शिवरस्ता, गुजरखेडे रस्ता ते अहिरे वस्ती रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून सुरू आहे. चार महिने झाले तरी येवला पंचायत समितीने मजुरांचे व कामाचे बिल अदा केले नाही. विखरणीचे माजी सरपंच यादव अहिरे, यमाजी शेलार यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस तालुका अध्यक्ष मोहन शेलार हे पंचायत समिती उपअभियंता दिलीप धामणे यांच्याकडे गेले असता, मजुरांच्या बिलावर ५ टक्के द्या मग सही करतो, अशी थेट मागणी उपअभियंत्याने केल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. पैसे दिले तर सही करणार अथवा माझ्या सहीची काहीही गरज नाही, अशी सोयीची भाषा उपअभियंता धामणे यांनी चर्चेत वापरली असल्याचे शेलार यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पंचायत समितीमधील ग्रामसेवक या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असून, ग्रामसेवकाच्या बैठकीत या अधिकारीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. हे अधिकारी दिशाभूल करीत असल्याचे ग्रामसेवक संघटनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. (वार्ताहर)
''दुष्काळात लोकांना काम नाही. मजुरांनी काम केले तर अधिकारी पैसे घेतल्याशिवाय पैसे देत नाहीत. मजुरांकडून पैशांची अपेक्षा करणे ही येवला पंचायत समितीला लाजिरवाणी गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली असलेल्या येवला पंचायत समितीने विविध कामांच्या बिलासाठी टेबलाखालून घेणार्या पैशांचा भावफलक लावावा म्हणजे ग्रामीण भागातील मजुरांना त्याचीही अडचण होणार नाही.- मोहन शेलार,राष्ट्रवादी, युवक तालुका अध्यक्ष, येवला