भाऊसाहेबनगर : दोन वर्षांपासून बंद पडलेल्या निफाड सहकारी साखर कारखाना सहभागी तत्त्वावर चालविण्यास देण्याच्या प्रक्रियेस राजकीय हस्तक्षेपामुळे शासकीय अधिकारी टाळाटाळ करत आहेत. याच्या निषेधार्थ निसाकाचे कामगार मंगळवारी (दि. १०) कोकणगाव येथे रस्ता रोको करणार आहेत. कारखान्यावर नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळातील शासकीय प्रतिनिधी पदभार स्वीकारण्यास टाळाटाळ करतात. याच्या निषेधार्थ व निसाका सहभागी तत्त्वावर चालवण्यास देण्याची प्रक्रिया त्वरित करावी यासाठी निफाड सहकारी साखर कारखान्याचे कामगार बायकामुलांसह कोकणगाव फाट्यावर सकाळी १० वाजेपासून रस्ता रोको करून मुंबई-आग्रा महामार्ग बंद पाडतील, असा इशारा निफाड साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड. विलास आंधळे यांनी दिला आहे. दोन हंगामापासून बंद पडलेला कारखाना, कामगारांचे २८ महिन्यांपासून थकलेले पगार, कामगार वसाहतीचा खंडित झालेला वीज व पाणीपुरवठा याबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या निसाका कामगारांच्या द्वारसभेत अॅड. आंधळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. वेळ पडल्यास कामगार पिंपळस (रामाचे) येथे सुद्धा नाशिक औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको करतील. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास दुसऱ्या दिवसापासून दररोज पाच कामगार आत्मदहन करतील असाही इशारा त्यांनी दिला. याप्रश्नी निवेदन देण्यासाठी व परिस्थितीचे गांभीर्य अवगत करण्यासाठी निसाका कामगारांचे शिष्टमंडळ आंधळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ९) जिल्हाधिकारी विलास पाटील यांची भेट घेणार आहे. त्यामुळे शासनाच्या प्रतिनिधींना प्राधिकृत अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यास अडचण नाही. परंतु निरनिराळी कारणे पुढे करून प्रादेशिक सहसंचालक राजकीय हस्तक्षेपामुळे अडचणी निर्माण करीत आहे. कारखाना बंद पडल्यामुळे ऊस उत्पादकांची अवस्था वाईट आहे. कामगारांची अवस्था अत्यंत दयनीय असून कामगारांच्या बायकामुलांना पोट भरण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे. परंतु तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांची वाट लावणाऱ्या पुढाऱ्यांना याची खंत नाही अशी टीका त्यांनी केली. जिल्ह्यातील सर्व साखर कामगार या लढ्यात उतरणार असून निसाका कामगारांनी एकजुटीने लढ्यासाठी तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
निसाका सहभागी तत्त्वावर चालवण्यास देण्याची मागणी टाळाटाळ : कोकणगाव येथे कामगार रस्ता रोको करणार
By admin | Published: February 07, 2015 1:45 AM