पंचवटी : महापालिका प्रशासन अतिक्रमण आणि अनधिकृत जाहिरात फलक हटविताना कारवाई करताना भेदभाव करत असल्याचा आरोप मनसेने केला असून, कारवाई करताना मनपा अतिक्रमण विभागाने भेदभाव करू नये, असे निवेदन मनपा आयुक्त कैलास जाधव यांना दिले आहे.
विविध खासगी आस्थापना विकसकांद्वारे नाशिक महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. शहर विद्रुपीकरणास कारणीभूत अतिक्रमणासाठी मनपा अधिकारी स्तरावर अनेक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहे. अतिक्रमण काढण्याबाबत मनसेचे पदाधिकारी विविध सामाजिक संस्था संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा चौकशी केल्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. एकीकडे अतिक्रमणामुळे शहर विद्रुपीकरण झाले आहे. राजकीय पुढारी त्यांच्या पाठीराख्यांचे वाढदिवस व इतर फलक शहरात दिमाखाने फडकत आहेत.
शहरभर जाहिरातींचे ओंगळवाणे प्रदर्शन सर्रास सुरू आहे. मात्र मनपा अधिकारी मनसे पदाधिकाऱ्यांवर आकसापोटी शहर विद्रुपीकरणाची कारवाई करत आहे. मनपाने मनसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आकसापोटी केलेल्या कारवाईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करण्यात येऊन शहर महापालिकेने विद्रुपीकरणाविरुद्ध कारवाईत भेदभाव न करता अतिक्रमणे व अनधिकृत जाहिरात फलकांच्या बाबतीत समन्यायी कारवाई करावी, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. यावर कुठलाही भेदभाव न करता सर्वच अतिक्रमणे व अनधिकृत जाहिरात फलकांच्या बाबतीत समन्यायीपणे कारवाई करण्याची मागणी शहराध्यक्ष अंकुश पवार, उपशहराध्यक्ष अक्षय खांडरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, सचिन सिन्हा, योगेश लभडे आदींसह मनसे पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
इन्फो बॉक्स
कारवाईत दुजाभाव
महापालिकेने अनधिकृत फलक, जाहिरात करणाऱ्यांवर कारवाई करावी; मात्र कारवाई करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. शहरात अनेक राजकीय पक्षांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते फलकबाजी करतात मात्र महापालिका त्यांच्यावर कारवाई करण्यास पुढे का येत नाही.
अंकुश पवार, मनसे शहराध्यक्ष