कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव बघता व तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयात कोविड केंद्र सुरू करण्यात आले होते. गेल्या सात-आठ महिन्यांपासून सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याने विविध आजारांकरिता रुग्णालयात तपासणी बंद आहे. त्यामुळे रुग्णांना तपासणी व उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतकरी, मजुरांसह गरीब व गरजू रुग्णांना विविध तपासण्या तसेच उपचारासाठी खासगी रुग्णालये परवडत नाहीत. येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या घसरणीवर आल्याने तसेच अनेक दिवसांपासून रुग्णालयात कोरोना रुग्ण नसल्याने सामान्य जनतेच्या आरोग्य तपासणी व उपचारासाठी तत्काळ रुग्णालय सुरू करण्यात यावे. माळमाथा परिसरातील ४२ खेड्यांसह राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना उपचारापासून वंचित राहावे लागत असते. महिलांसह वयोवृद्ध व्यक्तींना सोयीचे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नाॅन कोविड केंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
कोट.....
येथील ग्रामीण रुग्णालय गरीब व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उभारण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना केंद्र सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर विविध आजारांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. त्यामुळे तेथील उपचारासाठी लागणारा खर्च व वेळ पाहता शासनाने तत्काळ सामान्य रुग्णांच्या तपासणीसाठी ओपीडी सुरू करावी.
- विनोद देसले, सामाजिक कार्यकर्ते, झोडगे