नाशिक : गेल्या सात वर्षांपासून सप्तशृंगी गडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला आहे. ३१ कोटींचे प्राथमिक स्वरूपातील काम ठेकेदाराच्या फायद्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क ११० कोटींवर नेल्याचा आरोपही स्थानिकांनी यावेळी त्यांच्याकडे केला. सप्तशृंगी देवी गडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रकल्पास खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी काही लोकप्रतिनिधींसह नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कळवण विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच ट्रॉली प्रकल्पाच्या अधिकाºयांची कानउघडणी केली. या प्रकल्पाच्या ट्रॉलीची किंमत दिवसेंदिवस वाढत असून भाविकांना गेल्या ७ वर्षांपासून त्याचा लाभ घेता येत नाही. स्थानिक तसेच कळवण तालुक्यातील बेरोजगारांना या प्रकल्पात रोजगार प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केल्या. भारतातील एकमेव असा फ्यूनिक्युलर ट्रॉली हा भव्य प्रकल्प येत्या नवरात्रोत्सवात भाविकांसाठी तत्काळ खुला करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या ट्रॉलीच्या उद्घाटनास मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करून लवकरच प्रकल्प सुरू करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, कळवण तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, सचिन सोनवणे, उपअभियंता पगारे, प्रकल्पाचे निरीक्षक श्री. सोपान आदी उपस्थित होते.
फ्यूनिक्युलर ट्रॉली भाविकांसाठी खुली करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:28 AM