त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरातील दिव्यांग तथा अपंग बांधवांचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाने दरमहा पेन्शन लागू करावी, अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधवांनी केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात व शहरातदेखील शेकडो दिव्यांग बांधव आहेत. दिव्यांग असल्यामुळे अनेक जण आपला उदरनिर्वाह करू शकत नाहीत. कोणाचे नातेवाईक चांगले असल्यास ते अशा दिव्यांगांना सांभाळतात. तथापि, अनेकांना ते बोजा वाटतात. साहजिकच असे लोक नकोसे होतात. काहींना उदरनिर्वाहाची चिंता वाटते. यासाठी शासनानेच त्यांना मदतीचा हात पुढे करावा. त्यांना पेन्शनचा लाभ तर द्यावाच शिवाय आवश्यक साहित्य उदा. अपंगांसाठीची सायकल, कुबड्या आदीदेखील पुरवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे आदींनी केली आहे. शासनाने दिव्यांग बांधवांसाठी तीन टक्के निधी खर्च करणे बंधनकारक असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. यासंदर्भात दिव्यांग बांधवांनी त्र्यंबकचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार व आरोग्य सभापती विष्णू दोबाडे आदींनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी दिव्यांग बांधवांच्या सर्व मागण्या रास्त असून, त्या मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. यावेळी दिव्यांग हरिदास सोनवणे, लक्ष्मण करपे, काळू खोडे, हिरामण काळे, महेंद्र दोंदे, त्र्यंबक गमे, हर्षदा सोनार, शाकीर पठाण, शायना पठाण, रवींद्र पवार, शकुंतला काळे, भगवान गायकवाड, भगवानदास कासट, ऊर्मिला कासट आदी उपस्थित होते.योजनांची अंमलबजावणी करावीदिव्यांग बांधव कष्टाची कामे करू शकत नसल्याने त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, मतिमंद व अस्थिव्यंग बांधवांसाठी दरमहा पेन्शन चालू करावी. दिव्यांग बांधवांसाठी केंद्र शासन व राज्य शासन विकासासाठी अनेक उपयुक्त योजना राबवित आहे, त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या योजनांची कठोर अमंलबजावणी करावी. दिव्यांग बांधव अनेक शारीरिक व्याधींनी त्रस्त असतात त्यासाठी त्यांचे आरोग्य शिबिर घेऊन गरजेनुसार साहित्य वाटप करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
दिव्यांग बांधवांना पेन्शनचा लाभ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:13 AM