इगतपुरी : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील टाके घोटी येथे इगतपुरी तालुका बैलगाडाशौकीन शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. तामिळनाडू व कर्नाटक या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यतींबाबत कायदा केलेला आहे.बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देसी गाय-बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे केले जाते. शर्यतबंदीमुळे देसी गाय-बैलांचे उपयुक्तता मूल्य धोक्यात आल्यामुळे जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच शर्यतबंदीमुळे शेतकऱ्यांची गाय-बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होत आहे. ग्रामीण भागात देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन, विक्री व शर्यती आयोजित करण्याची परंपरा आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते. यासाठी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी तत्काळ घेतली जावी याबाबत प्रयत्न व्हावेत, यासंबंधी चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री यांचे दालनात बैठक घेतली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या आंदोलनात आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी जि. प. सदस्य संदीप गुळवे, गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाणे, माजी सभापती रघुनाथ तोकडे, शिवसेना तालुका प्रमुख भगवान आडोळे, गटनेते विठ्ठल लंगडे, भगिरथ मराडे, माजी सरपंच कैलास भगत, प्रशांत कडू, हरिश्चंद्र चव्हाण अनिल भोपे, नंदलाल भागडे, त्र्यंबक गुंजाळ, दशरथ भागडे, हिरामण लहाणे, गोटीराम चव्हाण, जालिंदर कडू, शिवनाथ काळे, देवीदास लंगडे, देवानंद गोईकणे, पोपट लंगडे, राजू लहाने, कार्तिक कोंडाजी गतीर, गंगाराम कडू, गणेश गतीर, मच्छिंद्र तोकडे, बाजीराव गतीर, जगन गतीर, सुनील गुंजाळ, नामदेव लहाने, विजय कडू, अंकुश कडू, गुरुनाथ कडू, सुधाकर आडोळे, संजय भगत यांच्यासह शेकडो अखिल भारतीय शर्यतशौकीन उपस्थित होते.