मालेगाव : शहरात नशेच्या गोळ्या (कुत्ता गोळी) गावठी कट्टे आढळून येत आहेत. तसेच गोळीबाराचे प्रकारही घडले आहेत. पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत, जावेद खाटीक गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी कुल जमाती तंजीमच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांकडे गावठी कट्टे व रिव्हॉल्व्हर सापडत आहेत. दररोज गोळीबाराच्या घटना घडत आहेत. नशेच्या गोळ्यांचे सेवन करून तरुण वर्ग गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत. जावेद खाटीक गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींना तातडीने अटक करावी तसेच बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना सोयी- सुविधा पुरवाव्यात अशी मागणी मौलाना अब्दुल हमीद अझहरी, मौलाना शकील फैजी, मौलाना फिरोज आझमी, मौलाना अजीम फलाही, सुफी नुरुलएन साबरी, आरिफ हुसेन, मोहम्मद लकी मौलाना सिराज कासमी आदींच्या शिष्टमंडळाने केली आहे.