संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १०० टक्के भरती सरळसेवा मार्गानेच व्हावी, अशी मागणी केली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांनी ११ जून २०२० च्या राज्य शासनाच्या निर्णयाची संदर्भ देत त्याचवेळी संघटनेला लिहिलेल्या पत्रात कुशल व अकुशल संवर्गातील भरती सरळसेवा पद्धतीने करण्याचे आश्वासन दिले होते. तरीदेखील छुप्या मार्गाने ही भरती कंत्राटी आणि बाह्यस्त्रोत मार्गाने सुरु आहे. कोरोना काळात तातडीची आवश्यकता म्हणून आरोग्य विभागात १० हजार १२७ पदे भरण्यात येणार आहेत. यापैकी सार्वजनिक आरोग्य विभागाने सरळसेवा भरतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली तरी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मात्र जाणीवपूर्वक विरोधी भूमिका घेत असल्याचे संघटनेचा आक्षेप आहे. याबाबत राज्य सरकारी गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री, मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक यांना लेखी निवेदन देखील देण्यात आले आहे.
-योगेश सगर कसबे सुकेणे