कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वीज महानिर्मिती कंपनीने प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी नवीन बॅचची भरतीप्रक्रिया १७ सप्टेंबर २०२० रोजी परिपत्रक काढून पुढील आदेश येईपर्यंत थांबविल्याने प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हवालदिल झाले होते. त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया थांबल्याने पुढे काय होते, याची प्रतीक्षा लागून राहिली होती. प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांच्याशी संपर्क साधून पालकमंत्री छगन भुजबळ यांना सदर बाब अवगत करण्याची विनंती केली. त्यानुसार सागर जाधव यांनी पालकमंत्री भुजबळ यांना निवेदन देऊन, सदर भरतीप्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून, तात्काळ भरतीप्रक्रिया राबवण्याबाबत विनंती केली तसेच मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर ऊर्जामंत्री राऊत यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी सागर जाधव, अशोक पगारे, भूषण पगारे आदी उपस्थित होते. निवेदनावर कौशल पगारे,आकाश अरिंगळे, निखिल म्हस्के, प्रतीक अरिंगळे, संदीप म्हस्के आदींच्या स्वाक्षरी आहेत.
फोटो- महानिर्मिती कंपनीतील प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी भरतीप्रक्रिया सुरू करण्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देताना सागर जाधव, अशोक पगारे, भूषण पगारे. (फोटो १७ एकलहरे)