देवळा : रामेश्वर येथील किशोर सागर धरणातून पुढे वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडून पूर्व भागातील कालव्याच्या लाभक्षेत्रात येणारे जलाशय भरून द्यावे, अशी मागणी दहिवड ग्रामपंचायतीचे सरपंच आदीनाथ ठाकूर यांनी पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चालू वर्षी देवळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, जनतेचा पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. तालुक्याची एकमेव आशा असलेल्या चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडलेले असून, ते रामेश्वर येथील किशोर सागर धरणात जमा होत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील सुभाषनगर, वाखारी, वाखारवाडी, खुंटेवाडी, विजयनगर, पिंपळगाव, मेशी, उमराणे, दहिवड आदी गावांतील जनतेने किशोर सागर धरणातून पुढे वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. देवळा तालुका प्रहार शेतकरी संघटनेनेही किशोर सागर धरणातून पुढे वाढीव उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून, कालव्याला पाणी न सोडल्यास ८ ऑक्टोबर रोजी देवळा येथील पाच कंदील चौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष संजय दहीवडकर, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, दशरथ पुरकर, भाऊसाहेब मोरे, हरीसिंग ठोके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------------
देवळा तालुक्यावर अन्याय
किशोर सागर धरण अद्याप ५० टक्के भरलेले आहे. चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याची मर्यादित उपलब्धता पाहता, पूर्व भागातील जनतेची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाला मेहनत घ्यावी लागणार आहे. देवळा तालुक्याची पाण्याची गरज भागविण्यासाठी पुनंद प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे, परंतु देवळा तालुक्यासाठी आरक्षित केलेले पाण्याच्या प्रमाणात चणकापूर धरणातून कालव्याला पाणी सोडले जात नाही. हा देवळा तालुक्यावर सातत्याने अन्याय होत आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून पुनंद धरणातून देवळा तालुक्याच्या हिश्श्याचे जेवढे पाणी पुनंद नदीला सोडण्यात येईल, तेवढेच पाणी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला सोडण्याचे नियोजन करून, होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------------
किशोर सागर धरणात सद्या असलेला पाणीसाठा. (२१ देवळा किशोरसागर)
210921\21nsk_1_21092021_13.jpg
२१ देवळा किशोरसागर