सिन्नर : तालुक्याच्या भोजापूर धरणातून दोडी बुद्रुक, दोडी खुर्द व नांदूरशिंगोटे आदी गावांमध्ये लाभक्षेत्रात सिंचनासाठी आवर्तन द्यावे, अशी मागणी भोजापूर डाव्या कालव्यावरील पाणीवापर संस्थेतर्फे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्याी, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर तातडीने आवर्तन सोडले जाईल, असे आश्वासन जलसंपदा विभागाने दिले.भोजापूर धरण यावर्षी आॅगस्ट १०० टक्के भरले होते. त्यातून खरिप आवर्तन सोडल्यानंतर पावसाने दडी मारल्याने धरण पुन्हा भरले नाही. तसेच धरणातून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याने धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी मागणी पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. दोडी, नांदूरशिंगोटे परिसरात पाऊस झाल्याने त्यावर शेतकºयांनी हरबरा व ज्वारीची पेरणी केली आहे. तसेच लाभ क्षेत्रात दोनशे हेक्टरवर डाळिंबाच्या बागा आहेत. या पिकांसाठी सिंचनाचे आवर्तन देण्याची मागणीही करण्यात येत आहे. यावेळी उपविभागीय अभियंता एस. एस. गोंदकर यांनी धरणातील सध्याचा साठा व सिंचनासाठी उपलब्ध साठा याची माहिती देत बिगर सिंचनाच्या आरक्षणावितिरीक्त सर्व पाणी सिंचनासाठी देण्याबाबत कालवा सल्लागार समितीकडे प्रास्तावित केले जाईल, असे सांगितले. कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर तातडीने आवर्तन सोडण्याची कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी शाखा अभियंता बी. डब्ल्यू. बोडके, पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष कारभारी आव्हाड, कारभारी शिंदे, भागवत घुगे, शरद केदार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रात सिंचनाचे आवर्तन सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 5:40 PM